अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना | २९ जुलै २०२५ – जालना जिल्ह्यातील पोलिस दलाने पुन्हा एकदा आपली कुशलता व तत्परता सिद्ध करत मोठ्या घरफोडी आणि कार चोरी प्रकरणाचा छडा लावत अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे एकूण ७,१९,८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार घरफोडी व एक कार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
कुंभारपिंपळगाव (ता. घनसावंगी) येथील ज्ञानेश्वरी ज्वेलर्समध्ये २३ जुलै रोजी झालेल्या १९.७६ लाख रुपयांच्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. या तपासाअंती शक्तीसिंग उर्फ शक्तीमान टाक (वय २२) यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने तीन साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ५.६७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
तसेच, अंबड येथून चोरी गेलेली १.५ लाख किंमतीची मारुती अल्टो कार (MH 12 BM 8706) देखील हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींनी याआधी जळगाव जिल्ह्यातील चोपडे नगर (पो. फत्तेपुर) आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आळंद (पो. वडोद बाजार) येथे मेडिकल स्टोअर फोडल्याची कबुलीही दिली आहे.
👮♂️ पोलिसांच्या कारवाईचा मोठा टप्पा
या संपूर्ण कारवाईत ४ घरफोडी आणि १ वाहन चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईसाठी स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या चमूतील अधिकारी व अंमलदार – सपोनि योगेश उबाळे, सैम्युअल कांबळे, भाऊराव गायके, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, सतिष श्रीवास, आक्कुर धांडगे, रमेश काळे, धीरज भोसले, कैलास चेके, सौरभ मुळे व अशोक जाधवर यांनी अत्यंत कुशल आणि धाडसीपणे कामगिरी बजावली.
गुन्हेगारांना चोख धडा
पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांत विश्वास आणि सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. गुन्हेगारांना ज्या पद्धतीने शिताफीने पकडले गेले आणि मुद्देमालाची साठवण व जप्ती झाली, त्यातून पोलिसांची कार्यक्षमता व तांत्रिक कौशल्य अधोरेखित होते.
ही कारवाई म्हणजे पोलिस दलाचा शिस्तबद्ध, तत्पर आणि परिणामकारक कार्यपद्धतीचा उत्तम नमुना असून, गुन्हेगारांना चोख शिक्षा देण्याचा निर्धार पोलिसांनी यशस्वी
करून दाखवला आहे.


Post a Comment
0 Comments