Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पत्नी गेल्यावर पतीचाही श्वास थांबला – अंबडमध्ये प्रेमाचा हृदयस्पर्शी प्रसंग

 



अंबड वार्ता/ प्रतिनिधी आकाश जळके


अंबड शहरात एक हृदयाला चटका लावणारी घटना घडली असून प्रेम, निष्ठा आणि सहजीवनाचा अद्वितीय प्रत्यय लोकांना आला आहे. कुरेशी मोहल्ल्यात राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याचा काही क्षणांच्या फरकाने मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.


प्राप्त माहितीनुसार, बाबाभाई उस्मान शेख (वय ८०, छकडेवाले हमाल) हे काही दिवसांपासून तापाने त्रस्त होते आणि खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांच्या पत्नी बेगमबी बाबाभाई शेख (वय ७०) या पूर्णतः ठणठणीत होत्या. मात्र दिनांक २८ जुलै रोजी मध्यरात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने अंबड उपजिल्हा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


पत्नीच्या मृत्यूची बातमी जेव्हा आजारी बाबाभाईंना समजली, तेव्हा त्या आघाताने ते ढासळले. काही क्षणांतच त्यांनीही प्राण सोडले. आपल्या सहजीवनातील जोडीदाराला हरवण्याच्या तीव्र वेदनेत त्यांनीही जगाचा निरोप घेतला.


विशेष म्हणजे, या वृद्ध दाम्पत्याची सुरुवातीपासून मनापासून सेवा आणि देखभाल त्यांचे जावई हमिद शेख मोहम्मद यांनी केली. आजारपणात रुग्णालयात नेणं, औषधोपचार आणि घरातील जबाबदारी त्यांनी अत्यंत जबाबदारीने पार पाडली. त्यांच्या समर्पणामुळे कुटुंबीयांमध्येही त्यांच्याविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.


या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शेकडो लोकांनी त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. "अशा प्रकारची घटना फक्त चित्रपटातच पाहायला मिळते" असे अनेकांनी भावना व्यक्त केल्या. बाबाभाई आणि बेगमबी शेख यांच्या निधनाने 'प्रेमाची खरी खोली आणि नात्यातील आपुलकी किती खोलवर असते' याचा प्रत्यय आला.


या दाम्पत्याच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे व पणतवंडे असा मोठा परिवार आहे. दोघांचाही अंत्यविधी अंबडमधील बागवान कब्रस्तान येथे एकत्र पार पडला. "सत्व विरह सहन न होणं" हेच या घटनेचे सार असल्याचे शहरातील अनेक नागरिकांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments