Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीची डिझेल चोरी उधळली! जालना पोलिसांची तत्पर कारवाई, चोरटे वाहनासह फरार

 


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

जालना (दि. 30 जुलै 2025) – समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत जालना महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मात्र, आरोपी अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून पळून जाण्यात यशस्वी ठरले.


दिनांक 30 जुलै रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक रामदास निकम हे आपल्या पथकासह समृद्धी महामार्गावर गस्त घालत असताना, निधोना (ता.जालना) येथील चॅनल क्र. 369 जवळ एक ट्रक (क्र. TG 07 U 7213) साईडला उभा दिसून आला. सदर ट्रक मुंबईहून नागपूरकडे कच्चा माल घेऊन जात होता. चालक योगेंद्र लक्ष्मण सिंह चौव्हाण केबिनमध्ये झोपलेला असताना, चार अज्ञात इसमांनी एका मारुती सुझुकी सियाज (क्र. MH 04 GB 2070) कारमधून येत डिझेल टाकी फोडून डिझेल चोरी करण्यास सुरुवात केली.


डिझेल चोरी होत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रतिकार केला. त्यावेळी चोरट्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील 3000 रुपये रोख रक्कम हिसकावून पळ काढला. त्यानंतर ट्रक चालकाने पेट्रोल पंपाजवळ आणून आणखी एका ट्रकचालकाच्या (शिवम तिवारी) वाहनातून डिझेल चोरी होत असल्याचे निदर्शनास आणले.


महामार्ग पोलिसांनी तत्काळ कारवाई करत स्थानिक हॉटेल चालकांच्या मदतीने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी आपले वाहन आणि चोरीचे डिझेल घटनास्थळी सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

सदर कारची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे 100 ते 105 लिटर डिझेल असलेले तीन कॅन, पाच रिकामे कॅन, डिझेल काढण्यासाठीचे पाईप, रेडमी कंपनीचा मोबाईल आणि लोखंडी तलवार आढळून आली. पोलिसांनी अंदाजे ₹2,18,835 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, चंदनझिरा पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक रूपाली दरेकर, पोलीस उपअधीक्षक डिसले, आणि पोलीस निरीक्षक किशोर चौधरी (महामार्ग सुरक्षा पथक, प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत प्रभारी अधिकारी पोउनि. आर. के. निकम, सपोउनि. शिवाजी साळुंके, नामदेव मिसाळ, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुनील राठोड, सुशील घागरे, मनोज व रवी पवार यांचा सक्रिय सहभाग होता.

Post a Comment

0 Comments