ट्रॅक्टरची ट्रॉली व मोबाईल चोरीप्रकरणी मौजपुरी पोलिसांची यशस्वी कारवाई – ६ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
मौजे हातवण शिवारात एका उसतोड कामगाराच्या ट्रॅक्टरची ट्रॉली व मोबाईल चोरीप्रकरणी मौजपुरी पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक करत तब्बल ६ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांच्या या तात्काळ आणि तडाखेबाज कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
🟠 चोरीचा प्रकार :
दिनांक २८ जुलै २०२५ रोजी, फिर्यादी यांनी त्यांचा महिंद्रा अर्जुन ५५५ ट्रॅक्टर आणि उसतोडीच्या कामासाठी वापरण्यात येणारी लाल रंगाची ट्रॉली ही नेहमीप्रमाणे हातवण शिवारातील शेत गट क्रमांक १०५ मध्ये उभी केली होती. त्या दिवशी रात्री गुरांना चारा देऊन ते घरी परतले असताना, त्यांच्या आखाड्यावर झोपलेल्या तीन मजुरांचे मोबाईल फोन आणि फिर्यादीची ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी लांबवली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
🟠 तपासाची दिशा आणि यश:
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंन्सल, अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे यांच्या सूचनेनुसार तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे शिवाजी पुंजाराम खोमणे (रा. भाटेपुरी) यास ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली व मुद्देमाल बीड जिल्ह्यातील वडवणी येथे लपवला असल्याचे सांगितले.
पोलिसांनी तत्काळ बीडला जाऊन दुसरा आरोपी परमेश्वर ऊर्फ लहानु रघुनाथ चंद (रा. मांडवा, ता. जि. जालना) यास अटक करत त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टरची ट्रॉली व मोबाईल फोन असा एकूण ₹६,६५,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
🟠 आरोपी पोलीस कोठडीत
सदर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून इतर वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस सखोल तपास करीत आहेत.
🟠 कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिकाऱ्यांनी केली:
पो.उप.नि. विजय तडवी,ग्रा.पो.उप.नि. प्रकाश जाधव,सफौ. ज्ञानोबा बिरादार,पो.ह. राजेंद्र देशमुख,म.पो.ह. रंजना चव्हाण,पो.अं. भगवान खरात, प्रदीप पाचरणे, अविनाश मांटे, प्रशांत म्हस्के, धोंडीराम वाघमारे, सदाशिव खैरे, कैलास शिवणकर संपूर्ण टीमच्या सतर्कतेमुळे व तत्परतेमुळे हा गंभीर गुन्हा केवळ काहीच दिवसांत उघडकीस आणण्यात आला.

Post a Comment
0 Comments