घुंगर्डे हादगाव (प्रतिनिधी) :
शेतकरी हितासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या समृद्धी साखर कारखान्याने बैलपोळा सणानिमित्त उस उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची भेट दिली आहे. गाळप हंगाम 2024-25 मध्ये गाळप झालेल्या उसासाठी कारखान्याने तिसरा हप्ता 100 रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे देण्याचा निर्णय घेतला असून ही रक्कम लवकरच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
याआधी समृद्धीने पहिला हप्ता 2,500 रुपये प्रति मे. टन आणि दुसरा हप्ता 200 रुपये प्रति मे. टन प्रमाणे शेतकऱ्यांना अदा केला होता. आता बैलपोळ्यासारख्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी घट्ट नातं असलेल्या सणानिमित्त तिसरा हप्ता जाहीर करून कारखान्याने पुन्हा एकदा शेतकरी हिताचा दाखला दिला आहे.
शेतकऱ्यांचा सण गोड करणारा निर्णय
“एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याचा निर्णय घेतला असून बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांना 100 रुपयांचा तिसरा हप्ता जाहीर केला आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल,” अशी माहिती चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी दिली
शेतकरी बांधवांना ऊसाच्या मोबदल्यात योग्य दर मिळवून देण्याच्या दिशेने समृद्धी साखर कारखान्याचे पाऊल कायमच ठाम आहे. बैलपोळ्याच्या मुहूर्तावर दिलेला हा हप्ता म्हणजे कारखाना व शेतकरी यांच्यातील विश्वास व नातेसंबंध आणखी बळकट करणारा आहे.

Post a Comment
0 Comments