Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बौद्ध विद्यार्थिनीला शैक्षणिक कागदपत्र नाकारल्याचा आरोप; जय आंबे नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ. राजगुडे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

*अंबड, प्रतिनिधी :-* जालना जिल्ह्यातील अंबड येथील जय आंबे नर्सिंग कॉलेज,अंबड येथील अध्यक्ष डॉ. रामेश्वर राजगुडे यांच्या विरोधात एका विद्यार्थिनीने गंभीर आरोप करत ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भारती प्रदीप माघाडे या विद्यार्थिनीने दिनांक 12/08/2025 रोजी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत हा गंभीर आरोप केला आहे.

त्यानुसार, माघाडे यांनी सन 2020 मध्ये जय आंबे नर्सिंग कॉलेजमध्ये जेएनएम (JNM) कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. संपूर्ण शिक्षण पूर्ण करून 2023 मध्ये सर्व फी देखील भरली, तरीही कॉलेज प्रशासनाकडून त्यांना पास आऊट डॉक्युमेंट्स देण्यास सातत्याने टाळाटाळ केली जात आहे. विशेषतः अध्यक्ष डॉ. राजगुडे यांनी “तू बौद्ध समाजातील असल्याने तुला डॉक्युमेंट्स देणार नाही,” असा जातीय विद्वेषपूर्ण अपमान केल्याचा थेट आरोप माघाडे यांनी केला आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, "डॉक्युमेंट हवे असतील तर पैसे भरावे लागतील, अन्यथा तुला नोकरी मिळू देणार नाही. माझ्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही," असे अध्यक्ष वारंवार धमकीच्या शैलीत बोलतात. इतकंच नाही, तर "तुझ्या शिक्षणाची वाट लावतो" असे स्पष्ट शब्दांत सांगून मानसिक छळ देखील केला जात असल्याचा आरोप आहे.

जिल्हाधिकारी, समाजकल्याण अधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्याकडे तक्रार दिल्यानंतरही काहीच कार्यवाही झाली नाही, अशी खंत माघाडे यांनी व्यक्त केली आहे. 12 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा कॉलेज गाठल्यावर, प्रिन्सिपल यांनीदेखील “अध्यक्षांच्या परवानगीशिवाय काहीच डॉक्युमेंट्स देता येणार नाहीत,” असे सांगितल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणामुळे शिक्षणाच्या माध्यमातून उभारलेली स्वप्ने उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत, अशी भावना माघाडे यांनी व्यक्त केली असून, संबंधित प्रकरणी डॉ. रामेश्वर राजगुडे यांच्यावर तत्काळ ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी अंबड पोलीस ठाण्याकडे केली आहे.

तपास सुरु असल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते. परंतु या प्रकरणात जातीय अत्याचाराचा कोणताही प्रकार आढळल्यास, संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

Post a Comment

0 Comments