अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
धनगर पिंपरी (ता. अंबड) —
"आम्ही कर भरतो, पण रस्ता मिळत नाही! का?"
हा प्रश्न आता धनगर पिंपरी गावातील प्रत्येकाच्या ओठावर आहे. कारण रस्ता आहे, पण चालण्यायोग्य नाही! मुख्य चौक ते जिल्हा परिषद शाळा या अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरात एवढे खड्डे आहेत की तिथं चालणं म्हणजे थेट 'खड्ड्यांमधून प्रवास'!
रुग्णांपेक्षा खड्डे आधी भेटतात, विद्यार्थ्यांपेक्षा धूळ आधी श्वासात जाते!
गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही रुग्णांना वेळेत पोहोचण्यात मोठा अडथळा येतो. विद्यार्थी रोज ही 'खड्डा अडवणूक' पार करत शाळेत पोहोचतात. वृद्ध लोकांना तर या रस्त्यावरून चालणं म्हणजे त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा आहे.
अपघात झालेत, तरीही प्रशासन झोपेत!
मागील महिन्यात खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात झाला. त्यानंतरही ना कुणी पाहणी केली, ना कुणी जबाबदारी घेतली. म्हणजे अपघातच का, मृत्यू व्हावा लागतो का काम सुरू व्हावं म्हणून?
निवडणुकीआधी वायदे, नंतर 'व्हाय नॉट ब्लेम गेम'?
ग्रामस्थ सांगतात की, "प्रत्येक निवडणुकीच्या आधी आमचं रस्ता स्वप्न दाखवलं जातं... पण निवडणूक संपली की आम्ही पुन्हा खड्ड्यांमध्येच!"
ते पुढे म्हणतात, "गावात पोहोचणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गाड्या खड्ड्यांवरून न उडाव्यात म्हणून खास कॅरम बोर्डसारख्या तात्पुरत्या डागडुजी केली जाते. पण आमचं काय?"
🛑 प्रशासन झोपेचं सोंग का घेतंय?
धनगर पिंपरी ग्रामस्थांची रागावलेली मागणी स्पष्ट आहे:
"आमच्या गावच्या रस्त्यांवरून एखादा आमदार, खासदार किंवा अधिकाऱ्याच्या गाडीने एकदा तरी प्रवास करावा – मग त्यांना समजेल, हा रस्ता नाही... ही जनता फसविण्याची रेषा आहे!"
आता ‘पावसाळा आला म्हणून थांबा’ किंवा ‘निधी मंजूर झाला आहे’ हे जुने डायलॉग चालणार नाहीत!
धनगर पिंपरीला रस्ता हवा, घोषणा नाही!

Post a Comment
0 Comments