घुंगर्डे हादगाव (प्रतिनिधी):
अंबड तालुक्यातील मत्स्योदरी विद्यालयात १७ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण सोळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राधा-गोपालांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाला रंगत आणली. लहान लहान बालकृष्णांनी “गोविंदा आला रे!” असा जयघोष करत मटक्याभोवती खेळ मांडला. दहीहंडी फोडण्याचा क्षण शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी आनंदाचा सोहळा ठरला.
‘गोपालकाला’ हा उत्सव म्हणजे श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण. लहानपणी कृष्ण आपल्या मित्रांसोबत मटक्यांतील लोणी व दही काढत असे. त्याच गोष्टीचे स्मरण ठेवून दहीहंडी परंपरा आजही उत्साहाने साजरी केली जाते. मत्स्योदरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही हाच वारसा जपत श्रीकृष्णाची लीला सादर केली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण सोळुंके, सर्व शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कृष्ण-राधेच्या वेशात सजवून संस्कृती व परंपरेची ओळख करून दिली. संपूर्ण शाळा परिसर कृष्णमय झाला होता.
“बालगोपालांच्या निरागस हास्याने आणि कृष्णभक्तीच्या उत्साहाने शाळेतून संस्कृतीची गोड परंपरा झळकली,” असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments