Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

“झाल्टा फाटा वळण रस्त्याचा शेवट – गडकरींनी दिला थेट रस्त्याचा शब्द!”

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून झाल्टा फाटा येथील रस्त्याबाबत सातत्याने केलेल्या मागणीला अखेर यश मिळत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सोमवारी मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन झाल्टा फाटा (जुना सोलापूर–धुळे महामार्ग) ते नवीन सोलापूर–धुळे महामार्ग थेट जोडरस्ता निर्माण करण्याबाबत निवेदन सादर केले.

सध्या या ठिकाणी नागरिकांना जेमतेम सातशे मीटर अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड ते दोन किलोमीटर वळण रस्ता वापरावा लागतो. या अवास्तव वळणामुळे नागरिकांना रोजच अपार त्रास सहन करावा लागतो. वाहनांची सततची कोंडी, वाहतुकीतील विलंब, इंधनाचा अनाठायी अपव्यय आणि वाढते प्रदूषण या समस्यांनी संपूर्ण परिसर त्रस्त झाला आहे. एवढेच नव्हे तर या ठिकाणी अपघातांचाही धोका मोठ्या प्रमाणावर वाढला असून हा रस्ता आता ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणूनही चिन्हांकित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून तातडीने थेट जोडरस्ता निर्माण करण्याची मागणी सातत्याने होत आहे.

या थेट रस्त्याचे बांधकाम झाल्यास केवळ वाहतूक सुलभ होणार नाही, तर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचेल, इंधनाची बचत होईल तसेच प्रदूषणावर आळा बसेल. म्हणजेच या एका छोट्याशा कामामुळे संपूर्ण शहर व परिसराला दिलासा मिळणार आहे.

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना थेट निवेदन दिले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत गडकरी यांनी “या प्रकरणात योग्य ती कार्यवाही केली जाईल” असे ठाम आश्वासन दिले. गडकरींच्या या आश्वासनामुळे छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाची लहर संचारली असून अखेर या रस्त्यावरील मृत्यूचा सापळा संपुष्टात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नागरिकांचा एकच सूर – महावितरणप्रमाणे दंडाधिकार दाखवणाऱ्या प्रशासनाने जर या ठिकाणीही तत्परता दाखवली, तर झाल्टा फाटा रस्ता लवकरच वास्तवात उतरेल. शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता आता तातडीने व्हावाच, हीच वेळची गरज आहे.


Post a Comment

0 Comments