Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अतिवृष्टीत दगावलेल्या २२ जनावरांच्या मालकांना ₹६.९१ लाखांची तातडीची मदत

 




अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि विजेच्या प्रकोपामुळे अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यात एकूण १९ शेतकऱ्यांची २२ लहान-मोठी जनावरे दगावली. या संकट काळात बाधित शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देत प्रशासनाने थेट त्यांच्या बँक खात्यात ₹६,९१,५०० (सहा लाख एक्याण्णव हजार पाचशे रुपये) जमा केले आहेत. अशी माहिती तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी श्री. विजय चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

जनावरांच्या नुकसानीवर तातडीचा दिलासा

गाय, म्हैस, बैल आणि शेळ्यांचा समावेश असलेल्या या २२ जनावरांचे मृत्यू प्रामुख्याने विजा पडून, पुराच्या पाण्यात वाहून जाणे आणि भिंत कोसळणे या कारणांमुळे झाले. प्रशासनाने वेगाने कार्यवाही करून सर्व प्रभावित शेतकऱ्यांना मदत डीबीटी (DBT) द्वारे ‘मायनस बीडीएस’ प्रणाली वापरून थेट खात्यात जमा केली.

लाभार्थ्यांचा तपशील

या मदतीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये लोणार भायगांव, धनगरपिंपळगांव, रेणापुरी, नालेवाडी, गोंदी, अंबड, आपेगांव, साडेगांव, धनगरपिंपरी, पानेगांव, काटखेडा, देशगव्हाण, लालवाडी, दाढेगांव, गोहीलागड आणि निहालसिंगवाडी या गावातील शेतकरी बांधवांचा समावेश आहे.

यामध्ये एका म्हशीसाठी ३७,५०० रुपये, एका बैलासाठी ३२,००० रुपये, गाईसाठी ३७,५०० रुपये आणि शेळीप्रमाणे ४,००० रुपये या प्रमाणे मदत निश्चित करण्यात आली.

इतर नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर

तहसीलदार विजय चव्हाण यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, घरांची पडझड, शेतजमीन खरडून जाणे, पूरामुळे झालेले इतर नुकसान याबाबत पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागातील अधिकारी – मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक – यांची विशेष बैठक घेऊन स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशानुसार अधिकाऱ्यांची पथके प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करत असून अहवाल तहसील कार्यालयात सादर केले जात आहेत. त्यानंतर हे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले जाणार आहेत. शासनाकडून अनुदान मिळाल्यानंतर सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप केली जाणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष

या संपूर्ण प्रक्रियेवर जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल व उपविभागीय दंडाधिकारी श्री. उमाकांत पारधी स्वतः लक्ष ठेवून आहेत. तहसीलदार श्री. विजय चव्हाण व उपविभागीय अधिकारी प्रत्यक्ष शेतांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत व आवश्यक सूचना देत आहेत.

शेतकऱ्यांना आश्वासन

“शेतकऱ्यांवर ओढवलेले हे संकट मोठे आहे. मात्र कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाकडून पूर्ण काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांनी निश्चिंत व आश्वस्त राहावे,” असे आवाहन तहसीलदार श्री. चव्हाण यांनी केले.


Post a Comment

0 Comments