वंचित बहुजन आघाडीच्या बंदच्या हाकेला मंठेकरांची शंभर टक्के साथ
शांततेत निघाला निषेध मोर्चा; 'नाही चलेगी... नाही चलेगी... तानाशाही नाही चलेगी'च्या घोषणांनी शहर दणाणले
मंठा/ता.२३ वृत्तसंकलन दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला मंठा शहरातील व्यापारी, व्यावसायिक, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शंभर टक्के साथ दिली. शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्याने मंठा शहरात बंदला व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजे छत्रपती संभाजी महाराज चौक येथून आज (ता.२३) गुरुवार रोजी सकाळी १० वाजता भव्य निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मुख्य महामार्गावरून मार्गक्रमण करत हा मोर्चा बस स्थानक मार्गे काढण्यात आला या मोर्च्याचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आला. मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध व्यक्त करत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. "नाही चलेगी... नाही चलेगी... तानाशाही नाही चलेगी", "विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा निषेध असो", "लोकशाहीचा विजय असो" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण पद्धतीने मोर्चा पार पडल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील प्रमुख मार्गांवर काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला असला तरी पोलिसांनी योग्य नियोजन करून वाहतूक सुरळीत ठेवली.
बंद आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंठा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजे छत्रपती संभाजी महाराज चौक, बस स्थानक परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच इतर संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांच्या दक्षतेमुळे संपूर्ण बंद आणि मोर्चा शांततापूर्ण वातावरणात पार पडला.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मंठा शहरातील व्यापारी, नागरिक, युवक आणि सर्व सामाजिक संघटनांनी दिलेल्या उत्स्फूर्त सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हा लढा लोकशाही आणि संविधानिक मार्गाने सुरू राहणार असल्याचा निर्धारही यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments