अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे.जायकवाडी धरण 80.70 टक्के भरले असून धरणात मोठया प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे.त्यामुळे जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याचे माजी मंत्री मा.राजेश टोपे यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना मा.राजेश टोपे म्हणाले की,गोदाकाठच्या दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी,नागरीकांनी गोदावरी नदीपात्रात जाऊ नये, विशेषतः अंबड, घनसावंगी, परतूर आणि पलीकडील माजलगाव, गेवराई भागातील गोदाकाठच्या गावात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी.घाबरून न जाता सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन मा.राजेश टोपे यांनी केले आहे. सदरील संदर्भात राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असून स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत.
नदीपात्रालगतच्या भागातील शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे, मोटारी, विद्युत उपकरणे तसेच पाळीव प्राणी,जनावरे यांना सुरक्षित ठेवावे. नदीलगतच्या घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे.कोणाच्याही मालाची अथवा जिवीत हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे गावकऱ्यांची काळजी घ्यावी. कुठलीही समस्या उद्भवल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांना सूचित करावे.असे आवाहन माजी मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments