घनसावंगी पोलिसांची मोठी कामगिरी
आरोपींनी सुरेश तुकाराम आर्दड याचे अपहरण करून खून केल्याची कबुली | गेवराई (बीड) येथून सर्व आरोपींना ताब्यात
अंबड वार्ता/प्रतिनिधी आकाश जळके
दिनांक २८ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कुंभार पिंपळगाव येथे घडलेल्या शोकांतिक अपहरण व खून प्रकरणात घनसावंगी पोलिसांनी दि ४ जुलै रोजी फरार चारही आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी सुरेश तुकाराम आर्दड (रा. राजाटाकळी, ता. घनसावंगी) याचे जुन्या वैयक्तिक वादातून अपहरण करून नंतर खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनेचा क्रमवार तपशील
दिनांक २८ जून रोजी रात्रीच्या सुमारास, आरोपींनी एकत्र येऊन कट रचला. त्यांनी गावठी कट्टा व कुऱ्हाडीचा धाक दाखवत सुरेश आर्दड याला जबरदस्तीने एका पांढऱ्या चारचाकी वाहनात बसवून अपहरण केले. यावरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
२९ जून रोजी सकाळी ११ वाजता, पोलिसांना माहिती मिळाली की पोलीस ठाणे किनगाव राजा (बुलढाणा) हद्दीतील तळेगाव शिवारातील रस्त्यालगत एका अनोळखी पुरुषाची प्रेत आढळून आली आहे. वर्णन मिळतेजुळते असल्यामुळे तपास पथकाने नातेवाईकांना पाठवून प्रेताची ओळख पटवली, व ती व्यक्ती सुरेश तुकाराम आर्दड असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिस तपासात आरोपींनी गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्ह्यात BNS कलम 103(1), 61(2) अंतर्गत खुनाचा आरोप देखील जोडण्यात आला.
फरार आरोपींची अटक
खून करून फरार झालेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे
1. हरी कल्याण तौर (28 वर्षे, रा. राजाटाकळी)
2. सखाराम ऊर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड (28 वर्षे, रा. राजाटाकळी)
3. हिनाज बाबामिया सैय्यद (32 वर्षे, रा. कुंभार पिंपळगाव)
4. महादेव अंबादास आव्हाड (28 वर्षे, रा. एकलहरा, जि. छ. संभाजीनगर)
पोलिसांनी या आरोपींचा माग काढण्यासाठी जालना, बुलढाणा व छ. संभाजीनगर जिल्ह्यांत शोध मोहीम राबवली. आरोपी सतत ठिकाणं बदलून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर, पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्या नेतृत्वाखाली गोपनीय माहितीच्या आधारे, दिनांक ४ जुलै रोजी गेवराई (जि. बीड) येथे सापळा रचून सर्व आरोपींना वाहनासह अटक करण्यात आली.
सर्व आरोपींना मा. न्यायालयात हजर करण्यात आले असून 07/07/2025 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. तपास अधिक गतीने सुरू असून, हत्येचे नेमके कारण व अन्य कोण सहभागी होते का, याचा शोध घेणे सुरू आहे.
या यशस्वी कामगिरीमध्ये सहभाग
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कृष्णा खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली घडली.
संपूर्ण तपासात योगदान देणारे अधिकारी आणि कर्मचारी
पोलीस निरीक्षक केतन राठोड, सहाय्यक पो.नि. अशोक खरात, पोहवा रंजीत वैराळ,पोशि राधेश्याम गुसिंगे,पोशि प्रकाश पवार,पोशि सुनिल वैद्य,पोशि संतोष एसलोटे घनसावंगी पोलिसांनी एका गंभीर गुन्ह्यात केवळ काही दिवसांत अटक करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे नागरिकांत विश्वास निर्माण झाला आहे.

Post a Comment
0 Comments