भोकरदन (प्रतिनिधी) – तालुक्यातील मौजे खातगाव येथील शासकीय गायरान गट नंबर ५७ मधील बेकायदेशीर अतिक्रमण तत्काळ हटवावे आणि मंदिर परिसरातील अतिक्रमणधारकांवर कारवाई करून अडथळा दूर करावा या मागणीसाठी परमपूज्य शिवरुद्र योगी महाराज यांनी सुरू केलेले आमरण संजीवनी समाधी उपोषण आज दुसऱ्या दिवशीही ठामपणे सुरू आहे.
खातगाव गावातील सुमारे १०० एकर शासकीय गायरान जमिनीत गावातील काही शेतकऱ्यांनी बेकायदेशीरपणे निवासी घरे व शेती तयार करून अतिक्रमण केले आहे. याच गट क्रमांकामध्ये शिवरुद्र योगी महाराज यांचा शिवशक्ती कैलास आश्रम असून, या ठिकाणी भव्य मंदिर उभारणीचे कार्य सुरू आहे. मात्र अतिक्रमणधारकांनी मंदिर परिसरातील मोकळी जागा बळकावून मंदिर उभारणीस अडथळा निर्माण केला आहे.
या संदर्भात शिवरुद्र योगी महाराज गेल्या तीन वर्षांपासून विविध स्तरांवर निवेदने देऊन कारवाईची मागणी करत आहेत. मात्र महसूल विभागासह शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी दिनांक ३१ जुलै २०२५ पासून मंदिर परिसरात स्वतः एक मोठा खड्डा खोदून त्यात बसून आमरण उपोषणास प्रारंभ केला. त्यांनी हे आंदोलन “संजीवनी समाधी आंदोलन” असे नाव दिले असून, अतिक्रमण हटेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, आंदोलनाची तीव्रता पाहता दिनांक १ ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालयाच्या वतीने श्री. अमोल पाटील, श्री. घोडके, शिवसेना तालुकाप्रमुख नानासाहेब वानखेडे, समाधान वानखेडे, भास्करराव पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपोषण स्थळी भेट देऊन चर्चा केली. यावेळी तहसीलदारांनी दिनांक ६ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. मात्र, तरीही शिवरुद्र योगी महाराज हे उपोषणावर ठाम असून, सर्व गायरान अतिक्रमण पूर्णतः हटवले जाईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
या आंदोलनामुळे गावामध्ये आणि परिसरात खळबळ निर्माण झाली असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गावातील नागरिक, भाविक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही या आंदोलनाबाबत चर्चेचे वा
तावरण आहे.

Post a Comment
0 Comments