Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जालना जिल्ह्यातील जलसंवर्धन योद्ध्यांचा सन्मान – समस्त महाजन ट्रस्टतर्फे विशेष कार्यक्रम





 अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

जालना (प्रतिनिधी) :पाणीटंचाई व दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतशिवार पाणीदार करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या जालना जिल्ह्यातील ३२२ गावांतील जलसमितीतील संघर्ष योद्धा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या भव्य कार्यक्रमाचे आयोजन समस्त महाजन ट्रस्ट, मुंबई यांच्या श्रीमती नुतन दीदी देसाई यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून, दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी, शुक्रवार सकाळी 9.30 ते 12.00 वाजता महाराजा अग्रसेन भवन, जेईएस कॉलेज रोड, मुलींची जिल्हा परिषद शाळेसमोर, जालना येथे हा विशेष सोहळा होणार आहे.

 गाव टँकरमुक्त करण्यासाठी जलयोद्ध्यांचा संघर्ष

जालना जिल्ह्यातील ३२२ गावांनी लोकसहभागातून नाले, ओढे, नद्या यांचे खोलीकरण-रुंदीकरण, तळ्यातील गाळ काढणे, वॉटर बँक तयार करणे अशा कामांतून जलसंधारणाचा क्रांतिकारी इतिहास रचला आहे.

गाव पातळीवरील जलसमिती व ग्रामपंचायतींच्या अथक प्रयत्नांमुळे, वेळप्रसंगी डिझेल खर्चासाठी वर्गणी गोळा करून, रात्रंदिवस श्रम करून शेतशिवार पाणीदार करण्यात आले.

 “मराठवाड्यात वर्षभरात फक्त ९६ तास पाऊस पडतो, पण त्या प्रत्येक थेंबाला अडवून जिरवले, म्हणून आज वॉटर बँका भरल्या आणि भूगर्भजल पातळी वाढली,” असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

        जलक्रांतीचे जनआंदोलन


विद्यार्थ्यांच्या रॅलीतून, ग्रामसभा व बैठकीतून जनजागृती करत जल अडवा-जिरवा, गाव टँकरमुक्त करा हे ब्रीद अंगीकारले गेले. परिणामी आज जालना जिल्हा महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात लोकसहभागातून जलव्यवस्थापनाचे यशस्वी मॉडेल ठरला आहे.

या क्रांतिकारी कार्याला ओळख मिळावी म्हणून प्रशासन व समस्त महाजन ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने संघर्ष योद्धा शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास उपस्थित राहून जलक्रांतीला सलाम करावा, असे आवाहन जलक्रांती टीमने केले आहे.

Post a Comment

0 Comments