अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
जालना, (दि. २१ ऑगस्ट) - 'भ्रष्टाचाराला कवटाळलेल्या' एका ग्रामविकास अधिकाऱ्याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. एका गरजू व्यक्तीकडून कामाच्या बिलासाठी तब्बल २५ हजार रुपयांची लाच घेताना ही कारवाई जालना-अंबड मार्गावर करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायतीत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत पाणंद रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी अर्ज केला होता. तब्बल ११ लाख ४० हजार रुपयांचे हे बिल मंजूर झाले असतानाही, ते देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी विजय मोतीलाल शिंदे (वय ५०) याने ५० हजार रुपयांची लाच मागितली.
पण लाच देण्याऐवजी, तक्रारदाराने थेट एसीबीशी संपर्क साधला. एसीबीच्या पथकाने लगेचच तक्रारीची पडताळणी केली. लाचेची मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाल्यावर, त्यांनी सापळा रचण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी १२:१० वाजता जालना-अंबड रोडवरील अंबड चौफुली येथे हा सापळा यशस्वी झाला. शिंदेंने तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताच, एसीबीच्या टीमने त्याला जागीच अटक केली.
या कारवाईत शिंदेकडून लाचेची रक्कम २५ हजार रुपयांसह ९,२५० रुपये रोख आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. एसीबीने शिंदेंच्या भ्रष्टाचाराचे 'गिऱ्हाण' उघड केले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात चांगलीच दहशत पसरली आहे.

Post a Comment
0 Comments