अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
घनसावंगी (प्रतिनिधी): जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात आज सकाळी एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली. जुन्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने एक तरुणावर अमानुष हल्ला करत त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बोधलापुरी गावात समोर आली आहे.
मृत तरुणाचे नाव संभाजी भानुदास उंडे (वय 27 वर्षे) असे असून, सकाळच्या सुमारास त्याच्यावर व त्याच्या आई-वडिलांवर पाच जणांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर संभाजीच्या पोटावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यात तो गंभीर जखमी झाला.
गावातील नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात हलवले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अमानुष घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
या घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानंतर पाच संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका संशयितास ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
दरम्यान, संभाजी उंडे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन घनसावंगी येथील सामान्य रुग्णालयात करण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना पूर्वीच्या कौटुंबिक वादातून उद्भवली असावी, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पुढील तपास घनसावंगी पोलीस करत असून या घटनेमुळे पुन्हा एकदा गावात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Post a Comment
0 Comments