मठपिंपळगाव / प्रतिनिधी
अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव गावात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. गावचे सरपंच राजेश बाळाभाऊ जिगे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन मोटारसायकलींचा गुरुवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला.
एमएच 21 BX 5311 (हिरो सुपर स्प्लेंडर) आणि एमएच 21 BK 8174 (एचएफ डिलक्स) या क्रमांकाच्या दुचाकी घरासमोर गेटमध्ये उभ्या असताना पेट्रोल ओतून त्या पेटवण्यात आल्या. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, त्या क्षणी जिगे कुटुंब गाढ झोपलेले होते आणि दरवाजादेखील बाहेरून बंद करण्यात आला होता.
घरातून आरडाओरडा ऐकून त्यांच्या चुलत्यांनी पळत येऊन दरवाजा उघडून जीव वाचवला आणि आगीवर पाणी टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र हृदयात उठलेली भीती अजूनही ओसरलेली नाही.
४ घटना, ० अटक – पोलिसांची काय झोपलेली आहे?
या वर्षात मठपिंपळगावात ही चौथी घटना असून अजूनही एकाही घटनेचा ठोस तपास, कारवाई अथवा अटक झालेली नाही. कधी कॅमेऱ्यात चोर दिसतात, पण नंबर दिसत नाही; कधी तपास सुरू आहे म्हणून पंचनाम्याचं नाटक.
ग्रामपंचायतीच्या आणि चेअरमन नंधू जिगे यांच्या घराजवळील कॅमेऱ्यांमध्ये संशयित दिसूनसुद्धा पोलिसांची “कार्यवाही” केवळ फाईलच्या पानांवरच उरते आहे.
पोलिसांचा पंचनामा म्हणजे काय? ‘भविष्यात काहीतरी करू’ अशी वेळकाढूपणा वृत्ती!
आज सकाळी ५ वाजता अंबड पोलीस स्टेशनचे बिट जमादार नरोडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि दरवेळेसप्रमाणे "लवकरच तपास लावण्यात येईल" अशी ढोबळ आश्वासने दिली. मात्र गावकरी मात्र आता या आश्वासनांना कंटाळले आहेत.
गावकऱ्यांमध्ये संताप – “कॅमेऱ्यात सगळं दिसतं, पण पोलिसांच्या नजरेत काहीच दिसत नाही!”
गावकरी स्पष्टपणे सांगतात की, “कॅमेऱ्यात दोन जण मोटारसायकलवर येताना आणि जाताना स्पष्टपणे दिसतात, पण पोलिसांच्या तपासाला चष्मा का लागला आहे का?” असा प्रश्न सगळीकडे विचारला जात आहे.
गावात भितीचे वातावरण आहे, आणि पोलिसांकडून केवळ आश्वासनांची धूळफेक. एकामागून एक घटना घडत असतानाही, पोलिसांची ही असंवेदनशीलता आणि वेळकाढूपणा स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गडद प्रश्नचिन्ह उभे करत आहे.


Post a Comment
0 Comments