गोंदी (प्रतिनिधी) –जालना जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध सन 2025 मध्ये MPDA अंतर्गत प्रस्ताव सादर करून त्यांना स्थानबद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील सुयोग ऊर्फ सुशील मधुकर सोळुंके (वय 36 वर्षे, रा. गोंदी, ता. अंबड, जि. जालना) या वाळू तस्कराविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे.
सदर इसमाविरुद्ध गौणखनिज वाळू चोरीसह विविध गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध पूर्वी प्रतिबंधक कारवाई करूनही तो गुन्हेगारी प्रवृत्ती चालू ठेवत होता. त्यामुळे गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी त्याच्याविरुद्ध MPDA अंतर्गत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
मा. जिल्हादंडाधिकारी यांनी सदर प्रस्तावास मान्यता देत सोळुंके यास दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह हर्सुल, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील अशा प्रकारचे सराईत गुन्हेगारांची गुन्हानिहाय यादी तयार करण्यात आली असून, निकट भविष्यात त्यांच्याविरुद्धही प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली सपोनि योगेश उबाळे, सचिन खामगळ, आशिष खांडेकर, पोउपनि के. आर. हावले, बालाजी पदमने तसेच अंमलदार रुस्तुम जैवाळ, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, फुलचंद हजारे, अशोक नागरगोजे, दिपक भोजणे यांनी कार्यवाही पार पाडली.

Post a Comment
0 Comments