Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राजुर–टेंभुर्णी महामार्गावर भीषण अपघात : कार विहिरीत कोसळून पाच ठार, एक गंभीर जखमी

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

राजुर–टेंभुर्णी महामार्ग (NH 753 H) वरील गाडेगव्हाण फाट्याजवळ आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या हुंडाई आय-20 (MH-20-EE-8382) कारने रस्त्याच्या कडेला सकाळची सवयीनुसार वॉकिंग करणाऱ्या भगवान साळूबा बनकर (वय 50, रा. गाडेगव्हाण, ता. जाफराबाद, जि. जालना – माजी सरपंच) यांना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट महामार्गालगत असलेल्या सुमारे 35 फूट अंतरावरील खोल विहिरीत जाऊन कोसळली.



या भीषण अपघातात दोन महिला व तीन पुरुष जागीच ठार झाले, तर भगवान बनकर हे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये –

1. ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले (चालक, रा. गेवराई गुंगी, जि. छत्रपती संभाजीनगर)

2. पद्माबाई लक्ष्मण भांबिरे (65, रा. कोपर्डा, ता. भोकरदन, जि. जालना)

3. ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे (30, रा. कोपर्डा)

4. आजिनाथ तुळशीराम भांबिरे (24, रा. कोपर्डा)

5. धुरपताबाई सोपान डकले (रा. गेवराई गुंगी, जि. छत्रपती संभाजीनगर)





कार सुमारे 70 ते 80 फूट पाणी असलेल्या विहिरीत कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर बचावकार्य करावे लागले. प्रथम विहिरीतील पाणी मोटारद्वारे उपसून टाकण्यात आले, त्यानंतर हायड्राच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. त्यामधून पाचही मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णी येथे हलविण्यात आले. तर गंभीर जखमी झालेल्या भगवान बनकर यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल करण्यात आले आहे.



घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रूपाली दरेकर, अपर पोलीस अधीक्षक नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी कटेकर, महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रभारी उपअधीक्षक किशोर चौधरी यांनी हजेरी लावून संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन केले. तसेच एपीआय भारती (पोलीस स्टेशन टेंभुर्णी), एपीआय आहेरे (हसनाबाद), पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पो.उ.नि. रामदास निकम, हेडकॉन्स्टेबल बिराडे, हेडकॉन्स्टेबल बाबर, पोलीस अमलदार खराडे, डोईफोडे यांच्यासह महामार्ग पोलीस केंद्र, स्थानिक पोलीस स्टेशन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी, अग्निशामक दल जाफराबाद-भोकरदनचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे बचावकार्य यशस्वीरीत्या पार पडले.


दरम्यान, काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलीस व स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढल्यानंतर रस्ता पूर्णपणे मोकळा करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

 या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

0 Comments