Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कमलनयन बजाज रुग्णालयात आरोग्य योजना बंद - गरीब रुग्णांवर संकट

 




शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे तक्रार अर्ज

घुंगर्डे हादगाव ( प्रतिनिधी): बंडू शिंद

छत्रपती संभाजीनगर येथील कमलनयन बजाज रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बंद केल्याबाबतचा तक्रार अर्ज शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.व्ही.छल्लारे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे देण्यात आले.


या निवेदनात म्हटले आहे की,कमलनयन बजाज रुग्णालय या शासकीय मान्यताप्राप्त रुग्णालयात गरीब व गरजूंना महात्मा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY – आयुष्मान भारत योजना) अंतर्गत मोफत उपचार सेवा उपलब्ध करून दिली जात होती.परंतु अलीकडे रुग्णालय प्रशासनाने या दोन्ही योजना रुग्णांना देणे बंद केले असून रुग्णांकडून थेट पैसे आकारले जात आहेत.त्यामुळे सर्वसामान्य व गरीब रुग्णांना शस्त्रक्रिया,औषधे व तपासण्यासाठी मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


या योजना केंद्र व राज्य सरकार मार्फत राबविल्या जात असून या योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा आहे.जनतेच्या आरोग्याचा,हक्काचा तसेच जीवन मरणाचा प्रश्न आहे.रुग्णाला शासनाने घोषित केलेल्या योजनांचा लाभ घेण्याचा हक्क आहे.तो नाकारल्यास हा रुग्णांच्या मूलभूत अधिकारांचा भंग ठरतो.तो कोणालाही नाकारता येत नाही.गरीब ग्रामीण व शहरी लोकांचा मुख्य आधार या योजना आहेत.


तरी सदर रुग्णालयामध्ये या दोन्ही योजना तात्काळ सुरू करून जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा.तसेच कमलनयन बजाज रुग्णालयाने योजना थांबवण्याबाबत तातडीने चौकशी करण्यात यावी.योजना पूर्ववत सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा.जर रुग्णालयाने जाणूनबुजून योजना बंद केली असेल तर त्यांच्यावर शासकीय करारभंगाबाबत कारवाई करण्यात यावी.तसेच भविष्यात अशा योजना अन्यायकारकरित्या बंद करू नये.याबाबत योग्य तो आदेश द्यावा.


रुग्णाला अचानक शस्त्रक्रिया किंवा मोठा आजार आल्यास कुटुंबे कर्ज काढतात,जमीन गहाण ठेवतात सोनं विकतात.यातून कर्जबाजारीपणा व आर्थिक संकट निर्माण होते आहे.योजना नसल्यास संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडते.तसेच श्रीमंत लोक पैसे भरून उपचार घेतात.पण गरीब लोक उपचाराविना त्रास सहन करतात.आरोग्य क्षेत्रात मोठी विषमता निर्माण होते.वेळेत उपचार न झाल्याने गंभीर रुग्णांचा अकाली मृत्यू होऊ शकतो.कॅन्सर,हृदयविकार,मूत्रपिंड विकार अशा आजारांसाठी या योजना जीवनदायी ठरतात.


या गोष्टींमुळे शासकीय योजनेवरील विश्वास कमी होतो.कारण सामान्य माणूस सरकारच्या आरोग्य योजनांवर अवलंबून असतो.रुग्णालये योजना बंद करत असल्याने लोकांचा शासनावरील विश्वास उडतो.सदर रुग्णालयात दररोज शेकडो गोर गरीब रुग्ण उपचारासाठी येत आहे.परंतु रुग्णालयातील प्रशासन त्यांना या दोन्ही योजना बंद करण्यात आल्या आहेत,असे सांगतात.त्यामुळे रुग्णाला योग्य उपचार न मिळाल्यास दगावू शकतो.याची जबाबदारी कोण घेणार ? या सर्व गंभीर प्रश्नांवर शासनाने तातडीने कारवाई करून योजना सुरू कराव्यात,अशी मागणी शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments