अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड: पोलिस असल्याची बतावणी करत दोन अज्ञात व्यक्तींनी एका शेतकऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना अंबड-जालना महामार्गावर घडली आहे. चोरट्यांनी १ लाख १० हजार रुपये आणि सोन्याच्या दोन अंगठ्या घेऊन पोबारा केला.
मठपिंपळगाव येथील शेतकरी बळीराम जिगे (रा. मठपिंपळगाव) ता अंबड हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना विघ्नेश जिनिंगजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. "आम्ही पोलिस आहोत," असे सांगत त्यांनी जिगे यांना तपासणीच्या नावाखाली थांबवले.
त्या व्यक्तींनी जिगे यांच्याकडील पैशांची बॅग घेतली आणि त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या काढल्या. अंगठ्या कागदात गुंडाळून देत असल्याचे भासवून त्यांनी पितळेच्या दोन अंगठ्या त्यांच्या हातात दिल्या. जिगे यांना काही कळण्याआधीच चोरटे तिथून निघून गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जिगे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या लुटीत त्यांचे १ लाख १० हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment
0 Comments