पारनेर/ प्रतिनिधी गणेश शेरे
अंबड तालुक्यातील सारंगपूर गाव आज एका ठराविक मुद्द्यावर पेटला — गावात दारूची विक्री थांबवण्यासाठी गावातील महिला, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी थेट पोलिस ठाण्याचे दार ठोठावले. सरपंच अमोल काकडे, धनंजय काकडे, गजानन काकडे, संतोष कानडे, भरत काकडे, श्रीहरी काकडे, ओम बालासाहेब काकडे आणि मनोहर काकडे यांच्या नेतृत्वाखाली अंबड पोलिस स्टेशनला लिखित अर्ज देऊन दारूबंदीची ठाम मागणी करण्यात आली. महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आणि तरुणांची हजेरी यामुळे गावातील असंतोष स्पष्टपणे दिसून आला.
गावकऱ्यांनी स्पष्ट सांगितले — “दारूने आमची पिढी उद्ध्वस्त होत आहे. तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन संसार उध्वस्त करत आहेत. नवीन पिढीचे लहान मुलेही याच्या परिणामांना बळी पडत आहेत. आता पुरे झालं!”
शेवगा पाटीवर ‘दारू होम डिलिव्हरी’चा धंदा!
याच दरम्यान गावकऱ्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले की, शेवगा पाटीवर अज्ञात इसम मोटरसायकलवरून दारूची ‘होम डिलिव्हरी’ करत आहे. रोजच्या रोज हा धंदा सुरू असून, काही लोकांच्या दाराशीच व्यसनाचा माल पोचवला जातोय. गावातील महिला या प्रकारामुळे संतप्त आहेत. त्या म्हणतात — “आम्ही पतींना आणि घरातील पुरुषांना व्यसनापासून वाचवण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत असतो, पण असे धंदेबाज घरपोच दारू देऊन आमचे सर्व प्रयत्न पाण्यात घालतात.”
मोर्चा, निषेध आणि चेतावणी सकाळी गावातील महिला हातात फलक घेऊन एकत्र जमल्या. “दारूमुक्त गाव, निरोगी भविष्यासाठी!” अशा घोषणा देत त्यांनी गावातून मोर्चा काढला आणि थेट अंबड पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांना अर्ज देताना गावकऱ्यांनी सांगितले की, जर विक्री थांबली नाही तर गावपातळीवर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
गावाचा रोष — विक्रेत्यांना थेट समज मोर्चादरम्यान काही ठिकाणी विक्रेत्यांना थेट समज देण्यात आली. “हे फक्त कायद्याचा मुद्दा नाही, हा आमच्या घरांचा, मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे” असा महिलांचा ठाम सूर होता.
व्यसनमुक्तीचा संकल्पकार्यक्रमाच्या शेवटी गावकऱ्यांनी व्यसनमुक्त गावाचा संकल्प घेतला. ग्रामपंचायतीतून या विषयावर ठराव मंजूर करून तो शासन व प्रशासनाला पाठविण्याचे ठरले.
सारंगपूर आणि शेवगा पाटी आज ज्या पद्धतीने एकदिलाने उभे राहिले, ते पाहता इथून पुढे दारू विक्रेत्यांना गावात पाय रोवणं सोपं राहणार नाही, हे निश्चित आहे.

Post a Comment
0 Comments