अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
गोंदी (प्रतिनिधी) :गोंदी पोलीस ठाणे हद्दीत वाहतूक शिस्त व सुरक्षिततेसाठी आज (दि. 10 सप्टेंबर 2025) विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. शहागड, अंकुशनगर, छत्रपती शिवाजी हायस्कूल परिसर, वडीगोद्री व गुरुदेव विद्यामंदीर शाळा परिसरात सकाळपासूनच पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली.
या मोहिमेत एकूण 125 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 15 दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे सहा वाहने अल्पवयीन मुलांकडून चालविली जात असल्याचे निदर्शनास आले. संबंधित पालकांना समज देऊन नोटीस देण्यात आली तसेच वाहनांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
संपूर्ण मोहिमेत 38,000 रुपये इतका दंड आकारण्यात आला. पोलिसांकडून कळविण्यात आले की, अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही नियमितपणे हद्दीतील ठिकाणी राबविण्यात येणार आहेत.
ही मोहीम मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर प्रत्यक्ष कारवाईत गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशिष खांडेकर, पोलीस अंमलदार हजारे, केंद्रे, हवाळे, शेख, गायकवाड व चालक साठे यांनी सहभाग घेतला.

Post a Comment
0 Comments