अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना जिल्ह्यातील दुधना नदीपात्रातून सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन थेट तहसीलदारांच्या पथकाने उघडकीस आणत वाळू माफियांवर धडाकेबाज वज्रप्रहार केला आहे. प्रशासनाच्या या निर्भीड कारवाईने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तहसीलदार अंबड यांच्या आदेशावरून ग्राममहसूल अधिकारी स्वप्निल भगवान खरात व मंडळ अधिकारी एस. बी. कारमपूरी यांनी 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी वाडीगोड्री-चांभारवाडी परिसरात सापळा रचला. अचानक छापा टाकताच नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याचे समोर आले.
यावेळी लाल हेडचा विनाक्रमांक महिंद्रा ट्रॅक्टर ("श्रीनाथ अग्रो ट्रेलर") वाळू उपसताना रंगेहात पकडला. अधिकाऱ्यांना पाहताच ट्रॅक्टर चालक आणि त्याचे साथीदार घाईघाईने एक ब्रास वाळू खाली करून पळ काढत काजळ्याकडे पसार झाले. मात्र महसूल अधिकाऱ्यांनी हार न मानता ट्रॅक्टरचा तब्बल एक किलोमीटर पाठलाग करत मोबाईलवर थेट व्हिडिओ चित्रीकरण केले.
या कारवाईत एक आरोपीला जेरबंद करण्यात आले. त्याने ट्रॅक्टर मालक सुरजीत दिगंबर खंडेकर व चालक शिवा भोसले (रा. काजळा, ता. बदनापूर) यांची नावे उघड केली. पंचनाम्यातून १०० ब्रास वाळू (अंदाजे किंमत तब्बल ५ लाख रुपये) अवैधरीत्या उपसल्याचे उघड झाले.
या प्रकरणी आरोपींवर कलम 303(2), 3(5) BNS सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 48(7)(8) व गौण खनिज कायदा कलम 344 अन्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुभाष दोईफोडे (HC-659) करीत आहेत.
👉 तहसीलदारांच्या थेट नेतृत्वाखाली महसूल अधिकाऱ्यांनी दाखवलेली धाडसपूर्ण व निर्भीड कारवाई खरंच कौतुकास्पद आहे.
👉 या कार्यवाहीने वाळू माफियांचे धाबे दणाणले असून नागरिकांनी तहसीलदार व त्यांच्या पथकास सलाम
ठोकला आहे.

Post a Comment
0 Comments