अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात गुन्हे आढावा परिषद पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस मराठा आंदोलन व गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद बंदोबस्ताचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल जालना जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी तसेच अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
यानंतर गुन्हे आढावा परिषदेच्या माध्यमातून खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, मोसा चोरी, वाहनचोरी व इतर प्रलंबित गुन्हे लवकर निकाली काढण्याबाबत काटेकोर सूचना करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाच्या कामकाजाचा आढावा घेऊन अंमली पदार्थ विरोधी दर्जेदार कारवाया वाढविण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. यासाठी विशेष एनडीपीएस पथकाची स्थापना करून प्रशिक्षित अधिकाऱ्यांना कार्य सोपविण्यात आले आहे. जनतेला देखील 7843051026 या क्रमांकावर अंमली पदार्थांविषयी माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी गावभेटी वाढविणे, प्रत्येक गावात सीसीटीव्ही बसविण्याची जनजागृती करणे, नव्या कायद्यांची अंमलबजावणी करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे यावर भर दिला.
बैठकीदरम्यान जालना पोलीस घटकाच्या वेबसाईटवर (https://jalnapolice.gov.in/) ‘LOST AND FOUND TAB’ चे अनावरण मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे नागरिकांना हरवलेले कागदपत्रे जसे की आधारकार्ड, पॅनकार्ड, परवाने इत्यादी बाबत ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
याशिवाय जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना व शाखांना पासपोर्ट व्हेरिफिकेशन प्रणाली अधिक सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी 25 स्कॅनर, 21 मोबाईल टॅब, 04 संगणक व 01 लॅपटॉप वाटप करण्यात आले.
या गुन्हे आढावा परिषदेस मा. अजयकुमार बंसल (पोलीस अधीक्षक, जालना), मा. आयुष नोपाणी (अपर पोलीस अधीक्षक, जालना), सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, शाखा प्रमुख व ठाणेप्रमुख उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments