अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना जिल्ह्यात अल्पवयीन वाहन चालकांमुळे होणारे अपघात आणि वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी आज विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल 209 अल्पवयीन चालक वाहने चालवताना आढळले असून, त्यांच्याकडून एकूण ₹6,38,100/- दंड आकारण्यात आला.
ही मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. यासाठी समन्वयक म्हणून शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांची नेमणूक करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी ठाणेदार व कर्मचारी यांनी सकाळपासून शाळा, कॉलेज, शिकवणी वर्ग तसेच महत्वाच्या चौकांवर विशेष तपासणी केली.
अल्पवयीन चालक व त्यांची वाहने पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या पालकांना पाचारण करण्यात आले. अल्पवयीन मुलांना मोटार वाहन कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तर पालकांनाही समज देण्यात आली. पोलिसांनी स्पष्ट केले की, यापुढे कोणताही अल्पवयीन वाहन चालवताना आढळल्यास त्याच्या पालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाईल.
या मोहिमेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असल्याचा ठोस संदेश पोहोचला आहे.

Post a Comment
0 Comments