Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

"सिंघमगिरीची झलक! – तहसीलदारांचा जीव धोक्यात घालून वाळू माफियावर धाडसी हल्ला"

 


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके


अंबड (दि. १० सप्टेंबर २०२५):

अवैध वाळू उत्खनन रोखणे म्हणजे केवळ कागदोपत्री कारवाई नाही, तर जीव धोक्यात घालण्याचा थरारक प्रवास आहे. हे कालच्या घटनेत प्रत्यक्ष दिसून आले. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांनी आपल्या पथकासह दाखवलेली धाडसाची किमया ही *‘सिंघमगिरी’*पेक्षा कमी नव्हती.


हस्त पोखरी परिसरात मिळालेल्या माहितीवरून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई सुरू असतानाच, माफिया सुरजीत खंडेकर घटनास्थळी धडकला. त्याने अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत, स्वतः ट्रॅक्टर पळवून नेला आणि तब्बल ४० किमी जीवघेणा पाठलाग सुरू झाला. “पुढे आलात तर अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडून टाकीन!” अशी धमकी देत खंडेकरने दहशतीचे वातावरण निर्माण केले.


पण, “जीव जाईल तरी कर्तव्य सोडणार नाही” या ध्येयाने झपाटलेले तहसीलदार विजय चव्हाण आणि त्यांचे पथक मागे हटले नाही. पारनेर तांडा, नांदी, पिंपळगाव मार्गे चाललेल्या या श्वास रोखणाऱ्या थरारात शेवटी धनगर पिंपरी गावाजवळ ट्रॅक्टर पलटी झाला आणि महसूल प्रशासनाने तो जप्त केला.


या कारवाईत फक्त अवैध वाहतुकीवरच नाही, तर शासकीय अधिकाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण करण्याच्या गुन्ह्यावरही भारतीय दंड संहितेतील कलम ३०७, ३५३, ३७९, ५०६ यांसारखी कठोर कलमे लावली जात आहेत. महसूल कायद्यांतर्गत वाहन जप्ती आणि पाचपट दंडाची तरतूद देखील लागू होणार आहे.


या कारवाईत जिल्हाधिकारी अशीमा मित्तल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रिता मित्रेवार, उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, बदनापूर तहसीलदार हेमंत तायडे यांचे तसेच अंबड पोलिसांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. धनगर पिंपरी येथील ग्रामस्थांनी दाखवलेली मदत ही प्रशासनासाठी बळ ठरली.


या घटनेनंतर तालुक्यात एकच चर्चा सुरू आहे –

👉 “सिंघम सिनेमात पाहिलेला थरार प्रत्यक्षात अनुभवला!”

👉 “तहसीलदार चव्हाण यांचा धाडसी पवित्रा नसता, तर वाळू माफियांची दहशत अजून वाढली असती.”


शेवटी एवढेच –

अवैध वाळू माफियांना आता गय नाही,

आणि अंबड तहसील कार्यालयात सिंहासनावर बसला आहे खरा ‘सिंघम तहसीलदार’!

Post a Comment

0 Comments