अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड (प्रतिनिधी):मा. जिल्हादंडाधिकारी, जालना यांच्या सुधारीत परिपत्रकान्वये अंबड उपविभागातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १८४ रिक्त पदांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. तहसिल कार्यालय, अंबड येथे दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता तहसिल सभागृहात गावनिहाय व प्रवर्गनिहाय ३० टक्के महिला आरक्षणासह सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अंबड उपविभागात एकूण २५१ पदे मंजूर असून सध्या ६७ पदे भरलेली तर १८४ पदे रिक्त आहेत. यापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आदी प्रवर्गनिहाय तसेच ३० टक्के महिला आरक्षणासह रिक्त पदांची सोडत काढली जाणार आहे.
तहसिलदार कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरक्षणावरील सोडतीत अनेक गावांचा समावेश असून, वाचलखेडा, राणीउचेंगाव, टाका, शहागड, बनटाकळी, रामनगर, वसंतनगर, खेडगाव, शिराढोण, चिंचखेड, मुढेगाव, झिरपी, आलमगाव, बोरराजंणी, मावलपिंत्री तांडा, बोरगावखदै, चापडगाव, राहेरा, मासेगाव, झोडेगाव, अदेगाव, गुरुपिंप्री, दहेगाव देवी, अचलगाव खुर्द, वाळकेश्वर, डहाळेगाव, नारायणगाव, चंदनापुरी बु, बेलगाव, चिकनगाव, भगवाननगर, देशगव्हाण, देवहिवरा, पांगरखेडा, करजळा, खालापुरी यांसह अनेक गावांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
सदर सोडतीसंदर्भात ज्यांना हरकती असतील त्यांनी दि. ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधीत उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबड येथे कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात आपले आक्षेप नोंदवणे अनिवार्य राहील, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment
0 Comments