✍️ घुंगर्डे हादगाव (प्रतिनिधी)
अंबड तालुक्यातील घरकुल योजना प्रत्यक्षात ठप्प झाल्याचं चित्र समोर आलं आहे. तब्बल २५ हजारांहून अधिक घरकुलांना मंजुरी मिळालेली असतानाही केवळ चारच ग्रामीण गृहनिर्माण अभियंते कार्यरत असल्याने संपूर्ण तालुक्यातील प्रकल्पांचा बोजवारा उडालेला आहे.
ही गंभीर बाब शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. व्ही. छल्लारे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे निवेदन देऊन उघड केली.
📌 मंजूर घरकुलांची संख्या (तालुका अंबड)
पंतप्रधान आवास योजना – सुमारे १६,०००
यशवंतराव चव्हाण योजना – ३,५००
अहिल्यादेवी होळकर योजना – २,०००
मोदी आवास योजना – २,०००
रमाई योजना – १,७००
शबरी योजना – १००
🚨 ठळक अडचणी
👉 एका अभियंत्याकडे २५ ते ३० गावांचा भार; वेळेत तांत्रिक मान्यता न मिळाल्याने काम ठप्प.
👉 नऊ ते बारा महिन्यांत पूर्ण होणारी घरकुलं वर्षानुवर्षे अपूर्ण.
👉 स्वतःच्या पैशाने किंवा सावकाराकडून कर्ज काढून घर पूर्ण करणाऱ्यांना अनुदानाचे हप्ते वेळेवर मिळत नाहीत.
👉 व्याजाच्या ओझ्याखाली गरीब कुटुंबं होरपळून निघत आहेत.
👉 देखरेखीअभावी घरांची गुणवत्ता घसरते आहे.
जनतेत नाराजी
घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी असून प्रकल्प संचालक सुनील पठारे यांच्यावर कामकाजात ढिलाई आणि नियंत्रण गमावल्याचा आरोप होत आहे. पंचायत समिती प्रशासनाकडून अभियंत्यांची संख्या वाढवण्याची वारंवार मागणी होऊनही जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष झाल्याने लोकांमध्ये शासनाविषयी तीव्र नाराजी आहे.
✊ ठाम मागणी
“शासनाने तातडीने ग्रामीण गृहनिर्माण अभियंते नियुक्त करून मनुष्यबळाची कमतरता भरून काढावी; अन्यथा घरकुल योजना पूर्णपणे ठप्प होऊन गरीब कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न आणखी बिकट बनेल” – अशी ठाम मागणी शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष
आर. व्ही. छल्लारे यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments