तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन
बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक गावात मागासवर्गीय समाजाला अद्याप स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही,यामुळे समाजात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.यासंदर्भात गावातील नागरिकांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी,अंबड यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की,स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत मागासवर्गीय समाजाला स्मशानभूमी उपलब्ध झाली नसल्याची खंत अर्जात व्यक्त करण्यात आली आहे.ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात मागणी करूनही कारवाई झालेली नाही.
यासंदर्भात दि.१८ जुलै २०२३ आणि दि.९ ऑक्टोबर २०२४ रोजी गावात आमरण उपोषण करण्यात आले होते.यावेळी माजी मंत्री राजेश टोपे,जि.प.सदस्य सतीश टोपे,सरपंच उर्मिलाताई देशमुख,ग्रामसेवक प्रकाश शिंगणे यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले होते.त्यावेळी ६ महिन्यांत जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.मात्र,आजवर त्याची पूर्तता झालेली नाही.
गेल्या वर्षी पावसाळ्यात मातंग समाजातील दोन मृतदेहांना स्मशानभूमी नसल्याने हिंदू धर्मपरंपरेनुसार अंत्यसंस्कार न करता दफन करावे लागले.यंदाही दि.८ ऑगस्ट २०२५ रोजी गावातील एका वृद्ध महिलेला अंत्यविधीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
“माजी मंत्री राजेश टोपे यांचे हे मूळ गाव असूनही मागासवर्गीय समाजासाठी स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यात अपयश आले,ही मोठी शोकांतिका आहे,”असा सूर नागरिकांच्या बोलण्यातून उमटत आहे.अर्जदारांनी तहसीलदारांना सादर केलेल्या पत्रात या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून मागासवर्गीय समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी केली आहे.या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
या निवेदनावर आकाश कारके,सोमनाथ लोणके,गणेश पाटोळे,विकास ढवळे,राहुल, कारके,अशोक ढवळे,विकास कारके,दादासाहेब पाटोळे, अविनाश कारके,महादेव कारके,सागर कारके यांच्या सह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment
0 Comments