Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मंठा येथील रेणुका विद्यालयात शिक्षकांसाठी कार्यशाळा संपन्न.......



मंठा/ प्रतिनिधी : अध्यापनात उपक्रमशीलता वाढवून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी येथील रेणुका विद्यालयात शिक्षकांसाठी शनिवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी गोविंद चव्हाण, ज्येष्ठ विचारवंत प्रा.बी. वाय.कुलकर्णी, प्रथम बालरक्षक जगदीश कुडे, गटसमन्वयक के.जी.राठोड, प्राचार्य. डी.एस. बुलबुले, आर.के. राठोड, अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

         सुरूवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य.डी.एस. बुलबुले यांनी केले. यावेळी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना प्रा.बी.वाय. कुलकर्णी म्हणाले की, शिक्षकी पेशा हा इतर कुठल्याही क्षेत्रात काम करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु शिक्षकांनी आपले काम आवडीने आणि पूर्ण क्षमतेने करणे गरजेचे आहे. आवडीचे काम मिळण्यासाठी भाग्य लागते, परंतु मिळालेले काम आवडीने केले तर भाग्य पुन्हा परत येते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची चौकस आणि नवीन काहीतरी जाणून घेण्याची वृत्ती विकसित केली पाहिजे. ज्ञान संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न पडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

        याप्रसंगी शिक्षकांचे उदबोधन करतांना महाराष्ट्राचे प्रथम बालरक्षक जगदीश कुडे म्हणाले की, शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ध्येय ठेवून निष्ठेने काम करण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी बलस्थाने असतात, ती शोधून त्यांना शिक्षण देण्याची गरज आहे. श्रीराम तांडा येथील शाळेत सुरूवातीला आपल्याला कशाप्रकारे संघर्ष करावा लागला याविषयीचे अनुभव त्यांनी प्रभावी शब्दातून कथन केले. शिक्षकाने विद्यार्थी आणि शाळा मोठी केली की शिक्षकाला देखील मोठेपण प्राप्त होते असे त्यांनी स्वतःच्या अनुभवातून सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना गटशिक्षणाधिकारी गोविंद चव्हाण म्हणाले की, रेणुका विद्यालयाने शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करून अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला आहे. अशा प्रकारच्या कार्यशाळेतून शिक्षकांना आपले ज्ञान अद्ययावत ठेवून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवता येऊ शकते. 

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप देशमुख यांनी केले. शिक्षकांच्या वतीने श्रीमती एस. पी.राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments