मंठा/ प्रतिनिधी : मागील महिनाभरापासून मंठा तालुक्यात पावसाने थैमान घातले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टरवरील पिके सडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी बाजार समितीचे संचालक बाबाराव राठोड यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करणे शक्य नसल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी जिल्हाधिकारी जालना यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस व सोयाबीन पूर्ण पाण्याखाली जाऊन कुजली असून प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले. दसरा दिवाळी सणापूर्वी सोयाबीनची काढणी होऊन शेतकऱ्यांच्या हातात पिकाचे पैसे पडतात परंतु निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्याचप्रमाणे कापूस पिकाचे मोठ्य प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्वच मंडळातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अद्यापही पाणी साचलेले असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत गरज असून पंचनाम्याची अट शिथिल करून लवकरात लवकर सरसकट शेतकऱ्यांना दसरा दिवाळी सणापूर्वी आर्थिक मदत करावी अशी मागणी बाबाराव राठोड यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments