Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नितीन रोहोकले यांची जिल्हा परिषद जालनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

 


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधत 5 सप्टेंबर रोजी उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा जालना जिल्हा परिषदे कडून आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात येत असतो. यावर्षी सन 2025 चा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढालसखेडा येथील उपक्रमशील शिक्षक नितीन भागुजी रोहोकले यांना जाहीर झाला आहे. त्यांनी जि प प्राथमिक शाळा भालगाव , किनगाव , रवना, ढालसखेडा येथील शाळांमध्ये शैक्षणिक कार्य केलेले आहे. नितीन रोहोकले यांनी लोकसहभागातून डिजिटल शाळा करत विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात समजविण्यासाठी तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला . शाळेमध्ये इंटरॲक्टीव डिजिटल बोर्डचा वापर करत विद्यार्थ्यांना कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने स्पष्ट करण्याचा चांगला प्रयत्न केला. तसेच विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने संगणक साक्षर करण्यासाठी जि प प्रा शा रवना या शाळेतील विद्यार्थ्यांना MS-CIT परीक्षेस बसवून शाळेतच त्यांची परिपूर्ण तयारी करून घेतली. विद्यार्थी देखील MS-CIT परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. तसेच त्यांनी अनेक शैक्षणिक ॲप्सची तसेच शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती केली आहे. 

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा , स्कॉलरशीप परीक्षांची तयारी करता यावी यासाठी शालेय स्पर्धा परीक्षा हे यूट्यूब चॅनल तयार करून विद्यार्थ्यांना मोफत मध्ये मार्गदर्शन करत आहे. शालेय स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलच्या मदतीने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षा , स्कॉलरशीप परीक्षा यांची मोफत मध्ये तयारी करत आहेत. मागील वर्षी या मोफत तासिकांतील 19 विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला आहे.

   विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी यासाठी मी ज्ञानी होणार हा उपक्रम शाळेत राबवित आहेत. यातून विद्यार्थ्याचे सामान्यज्ञान वाढत आहे व विद्यार्थी स्पर्धा परीक्षां साठी तयार होत आहेत. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी पोलिस भरती , सरळसेवा परीक्षा , MPSC परीक्षांत यश मिळवित शासकीय सेवेत दाखल झाले आहेत. अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर झाले आहेत.

     SCERT पुणे आयोजित राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत तसेच राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत त्यांना आजपर्यंत अनेकवेळा बक्षिसे मिळाली आहेत. अक्षरआनंद वाचन चळवळ , लिप फॉर वर्ड , मी ज्ञानी होणार , शालेय स्पर्धा परीक्षा , तारखेचा पाढा , ज्ञानरचनावाद या सारखे अनेक उपक्रम शाळास्तरावर राबवून विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्ययन अनुभव देण्याचे शैक्षणिक कार्य त्यांच्या कडून घडत आहे. त्यांच्या या शैक्षणिक कार्या बद्दल त्यांना जालना एज्युकेशन फाउंडेशन , यशवंत प्रतिष्ठान , लिप फॉर वर्ड , रोटरी क्लब जालना , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद , महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती यांच्या कडून आदर्श शिक्षक पुरस्कार देवून त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. यावर्षीचा जिल्हा परिषद जालना यांच्या कडून देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नितीन रोहोकले यांना जाहीर झाल्या बद्दल गटसाधन केंद्र अंबडचे गटशिक्षणाधिकारी दिनेश शिनगारे, केंद्रप्रमुख अमोल कुलकर्णी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुभम जाधव, सहशिक्षक दिलिप तौर , योगशिक्षक गजानन पुरी तसेच ग्रामस्थ ढालसखेडा , भालगाव, रवना , किनगाव यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments