अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना :शेतकऱ्यांच्या अनुदान प्रकरणातील गाजलेल्या आर्थिक गैरव्यवहारात आर्थिक गुन्हे शाखा, जालना यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. शासनाने नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सन 2022, 2023 आणि 2024 मध्ये विविध शासन निर्णयांद्वारे दिलेले अनुदान फसवणुकीने लाटल्याच्या प्रकरणात एकूण १८ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज मा. जिल्हा व सत्र न्यायालय, अंबड यांनी फेटाळले आहेत.
📌 प्रकरणाची पार्श्वभूमी
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाल्याचे उघडकीस आले होते. या गंभीर गुन्ह्याची नोंद पोलीस ठाणे अंबड येथे गु.र.नं. 453/2025 अन्वये विविध कलमांखाली करण्यात आली असून, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
📌 अटकपूर्व जामीन फेटाळला
या प्रकरणातील काही आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. गायधनी यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर १८ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले.
📌 एक आरोपी अटकेत, सात दिवसांची पीसीआर मंजूर
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे सहाय्यक महसूल अधिकारी सुशिलकुमार दिनकर जाधव (रा. बुलढाणा) यास अटक केली. आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, अंबड यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने दिनांक 18/09/2025 पर्यंत 7 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
📌 सदर कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी (आर्थिक गुन्हे शाखा) श्री. सिद्धार्थ माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, श्रेयश वाघमारे तसेच महिला अंमलदार जयश्री निकम, निमा घनघाव, मंदा नाटकर यांचा सहभाग होता.
📌 सरकार पक्षाची सक्षम मांडणी
सरकार पक्षाचे जिल्हा सरकारी वकील श्री. बाबासाहेब इंगळे यांनी प्रभावीपणे बाजू मांडल्याने १८ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यश आले.
👉 या कारवाईमुळे जालना जिल्ह्यातील प्रशासन व न्यायालय यांचा गुन्हेगारीविरोधी व भ्रष्टाचारविरोधी ठाम संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे.

Post a Comment
0 Comments