Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

इंस्टाग्रामवर खंजरसह ‘रिल’ बनवून दहशत माजवणारे दोन इसम जेरबंद!

 


जालना स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके


जालना :

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणाईकडून अजब स्टंटबाजी केली जाते. मात्र चंदनझिरा येथे तर दोन तरुणांनी थेट धारदार खंजर घेऊन इंस्टाग्रामवर ‘रिल’ तयार करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत या दोन्ही तरुणांना जेरबंद केले.


घटनेचा तपशील असा की, दिनांक 04 सप्टेंबर रोजी चंदनझिरा येथे झालेल्या मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमात सचिन कैलास गायकवाड (21, रा. एकता चौक, चंदनझिरा) आणि सचिन शिवाजी जाधव (25, रा. एकता चौक, चंदनझिरा) या दोघांनी धारदार खंजर हातात घेऊन नाचत व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण केली. या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट पसरली होती.


याबाबतची माहिती मिळताच मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार स्थागुशाच्या पथकाने 08 सप्टेंबर रोजी इंद्रायणी हॉटेल परिसर, चंदनझिरा येथे सापळा रचून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून धारदार खंजर तसेच इंस्टाग्रामवर व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी वापरलेला मोबाईल असा एकूण ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या कारवाईनंतर चंदनझिरा पोलिस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, मा. अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोनि पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ तसेच स्थागुशाचे अमंलदार प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, संदीप चिंचाले व गणपत पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.


या कारवाईमुळे इंस्टाग्रामवर गुन्हेगारी स्टाईल दाखवून दहशत पसरवण्याचे प्रकार पोलिसांकडून अजिबात सहन केले जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments