Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सीईओ मिन्नूंची धास्ती! आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांचा अल्प प्रतिसाद



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

जालना जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा मात्र फारशा शिक्षकांना भावला नाही. प्रस्ताव सादर करण्याकडे शिक्षकांनी जाणीवपूर्वक पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले असून, यंदा संपूर्ण जिल्ह्यातून केवळ ३ शिक्षकच पात्र ठरले आहेत.

दरवर्षी १७ शिक्षकांचा सन्मान करण्याची प्रथा असताना, यंदा शिक्षकांच्या कमी प्रतिसादामागे जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी.एम. मिन्नू यांच्या कडक शिस्तीची धास्ती असल्याचे बोलले जात आहे. “फक्त पात्र शिक्षकांनीच प्रस्ताव सादर करावेत, अन्यथा मी स्वतः शाळेला भेट देऊन वस्तुस्थिती तपासेन” अशी स्पष्ट तंबी मिन्नू यांनी दिल्याने शिक्षकांनी सावध पवित्रा घेतल्याचे समजते.

जिल्हा परिषद प्रशासनाकडे अवघे १६-१८ प्रस्ताव प्राप्त झाले होते. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या छाननीनंतर फक्त ३ प्रस्ताव पात्र ठरले.

 त्यात नितीन भागूजी रोहकले (सहशिक्षक, जि.प. शाळा ढालसखेडा, ता. अंबड)

सुधाकर विठ्ठलराव राऊत (मुख्याध्यापक, जि.प. प्राथमिक शाळा मंगु जळगाव, ता. घनसावंगी)

गजानन मदनराव वायाळ (सहशिक्षक, जि.प. प्राथमिक शाळा उमरखेडा, ता. मंठा)

यांचा समावेश आहे. अप्पर आयुक्त राजेंद्र अहिरे यांनी दिनांक ४ सप्टेंबर रोजी यासंदर्भात लेखी आदेश दिले आहेत.

🟥 पुरस्काराचा अवमान?

आदर्श शिक्षकांच्या गौरवासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने प्रति शिक्षक केवळ दीड हजार रुपयांची तरतूद केली आहे. ग्रामविकास विभागाच्या दि. १२ डिसेंबर २००० च्या परिपत्रकानुसार ही रक्कम मंजूर करण्यात आली असली, तरी ती अत्यंत तुटपुंजी असल्याने शिक्षक वर्तुळातून संताप व्यक्त होत आहे. “इतक्या अल्प रकमेत आदर्श शिक्षकांचा सन्मान हा अवमानासमान आहे” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

👉 थोडक्यात, सीईओ मिन्नूंच्या कडक धोरणामुळे शिक्षक घाबरले आणि आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा फारसा गाजला नाही, अशी चर्चा जिल्ह्यात रंगली

Post a Comment

0 Comments