अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड तालुक्यातील मार्डी गावातील अल्पभूधारक शेतकरी योगेश्वर ज्ञानेश्वर राऊत व रामकिसन आसाराम बारोकर यांच्या घामाचे सोनं करून देण्याच्या गोड आश्वासनावर अशोक सीड्स कंपनी, बेंगलोर ने अक्षरशः लाखोंचा गंडा घातला आहे.
कंपनीचे एजंट दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी गावात आले आणि “आमच्या OP व्हरायटी १३७५८ नंबरच्या मिरचीच्या रोपांची लागवड केली तर शेतं पैशांनी बहरतील” अशी सबब सांगून शेतकऱ्यांना जाळ्यात अडकवलं. शेतकऱ्यांनी उसने पैसे जमवून शेडनेट उभारलं, लाखो रुपये खर्च करून लागवड केली. पण हाती आलं ते रिकामं शेत आणि शून्य उत्पादन!
फुलोरा तर आलाच नाही, आलेला तात्काळ गळून पडला. शेतकरी कितीही तडजोड करून खतं-औषधं टाकत राहिले, पण चित्र बदललं नाही. कंपनीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिसाळ यांनी वारंवार फसवी आश्वासने दिली, “वरिष्ठांना सांगतो, थांबा” अशी उडवाउडवी केली. आणि शेवटी शेतकरी अक्षरशः अडचणीत सापडले.
⚡ शेतकऱ्यांचे थेट आरोप —
“ही फक्त फसवणूक नाही, तर आमच्या घामाचं थेट लुटमार आहे. आम्हाला लाखो रुपयांच्या कर्जाच्या खाईत ढकलणं म्हणजे आमच्या पोटावर लाथ मारण्यासारखं आहे. कंपनीच्या खोट्या वाणामुळे आमचं जीवन उद्ध्वस्त झालं!”
आज माडी गावातील या शेतकऱ्यांच्या माथी कर्जाचं ओझं आहे, उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, आणि कंपनी मात्र गप्प बसली आहे.
✒️ शेतकऱ्यांचा इशारा स्पष्ट आहे – सरकारने तातडीने कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून नुकसानभरपाई दिली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनाचा ज्वालामुखी पेटवू!
Post a Comment
0 Comments