अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव दिनांक 4 /10/ 2025 वार- शनिवार रोजी अंबड शहरातील ओम शांती विद्यालयाच्या प्रांगणात संध्याकाळी 6.30 वाजता पार पडला.
यावेळी व्यासपीठावर गुरुवर्य गोकुळनाथजी महाराज ( नागपंथी प्रचारक, हिंदू धर्मप्रसारक ,शिव गोरखनाथ धाम, अंबड , मा. तालुका संघचालक निलेश लोहिया, प्रमुख वक्ते पश्चिम क्षेत्र कार्यकारणी सदस्य निलेश गद्रे उपस्थित होते.
यावेळी ओमकारेश्वर महादेव मंदिर श्रीकृष्ण नगर पासून ओम शांती विद्यालय अंबड पर्यंत स्वयंसेवकाचे शिस्तीत पथसंचलन घोषासह काढण्यात आले. संचलनात बाल स्वयंसेवक, तरुण स्वयंसेवक ,ज्येष्ठ स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माता भगिनी , नागरिकांनी संचलनाच्या मार्गात जागोजागी रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत केले.
कार्यक्रम स्थळी स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिकांमध्ये नियुद्ध ,सूर्यनमस्कार, सामूहिक समता ,खेळ, घोषाचे प्रात्यक्षिक सादर केले.
प्रास्ताविकामध्ये 1948 पासून आज पर्यंत अंबड मध्ये चाललेल्या संघ कार्याची ओळख सर्वांना करून देण्यात आली.
वक्ते निलेश गद्रे यांनी आपल्या बौद्धिकात पूजनीय डॉ. हेडगेवार यांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्यामागची आवश्यकता, उद्देश व ध्येय याबद्दल माहिती सर्वांना करून दिली. भारतातील असणारी विविधता यातील समान धागा असणारा हिंदू याला ओळखून आजपर्यंत संघाची वाटचाल चालू आहे असे त्यांनी सांगितले तसेच संघाने शताब्दी वर्षात हाती घेतलेल्या पंचपरिवर्तन यामध्ये स्वबोध, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य ,पर्यावरण संरक्षण याचा सर्व नागरिकांनी अंगीकार करावा असे आवाहान त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात वैयक्तिक पद्य, सांघिक पद्य, अमृतवचन, घोष प्रात्यक्षिक यांचा समावेश होता.
गुरुवर्य गोकुळनाथजी महाराज यांनी संघ कार्यास आशीर्वाद दिले.
मा. तालुका संघचालक निलेश लोहिया यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना घेण्यात आली.



Post a Comment
0 Comments