बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.खा. राजू शेट्टी यांनी शनिवार रोजी अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव,नाथवस्ती, सोमनाथ वस्ती,विज्ञानेश्वर आपेगाव या गोदावरी नदीच्या महापुराने बाधित गावांना भेटी देऊन अतिवृष्टी बाधित खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठे आंदोलन उभारणार असल्याचे सांगितले.
अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्यात यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे,तालुकाध्यक्ष राजेंद्र खटके, आपेगाव चे सरपंच पांडुरंग चौधरी, सुदाम जाधव, कृषी सहाय्यक चंद्रकात मुदिराज,अंगद काळे आदींची उपस्थिती होती.
साष्ट पिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मा.खा.राजू शेट्टी यांच्याकडे मांडतांना सांगितले की, आमच्या भागातील चांद सुरा नाल्याचे खोलीकरण व सरळीकरण झाले नसल्याने नाल्याचे पाणी शेतामध्ये शिरते. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने ते पाणी दिवसेंदिवस शेतातच साचून राहते.त्यामुळे खरिपातील सोयाबीन,कापूस,मूग,बाजरी व तुर पिकांचे मोठे नुकसान होते. गेल्या चार वर्षापासून सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने दरवर्षी नापीकी आमच्या पदरी पडत असल्याच्या व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या. प्रशासनाने या नाल्याचे खोलीकरण व सरळीकरण करावे याबाबत विभागीय आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी ग्रामस्थांना सांगितले.
यावेळी युवा तालुकाध्यक्ष उमेश पाष्टे, तालुका सचिव भारत उंडे, युवा नेते अभिजित काळे,युवा जिल्हाध्यक्ष नामदेव खोसे, ज्येष्ठ नेते तुकाराम गवळी, हभप गणेश बोचरे,परतूर तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे, धाकलगाव सर्कल प्रमुख विकास काकडे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments