अंबड वार्ता मुख्य संपादक बळीराम राऊत
अंबड (जि. जालना) : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड शहरात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. भारतीय जनता पक्षात उमेदवारी अर्जांचा अक्षरशः महापूर ओसंडून वाहत असून, नगरसेवक पदांसाठी तब्बल ११७ अर्ज दाखल झाले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी दोन दिग्गज नेत्यांच्या पत्नींनी अर्ज दाखल करून राजकारणात खळबळ उडवली आहे. या दोघींच्या आमनेसामने लढतीमुळे अंबडच्या राजकीय गल्लीपासून ते चहाच्या टपरीपर्यंत चर्चांचा विषय ठरला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते भागवत कराड यांनी सांगितले की, "भाजपने नगरपरिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून, या वेळेस भाजप कोणत्याही मित्रपक्षाला न घेता पूर्णपणे स्वबळावर निवडणूक लढविणार आहे." या विधानाने भाजपच्या स्वाभिमान आणि संघटनशक्तीबद्दलचा आत्मविश्वास दिसून आला आहे.
कराड यांनी सांगितले की, "२२ नगरसेवक पदांसाठी ११७ अर्ज आले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्ये पक्षाचे निष्ठावंत दीपक ठाकूर यांची पत्नी आणि राजकीय वारसा असलेले केदार कुलकर्णी यांची पत्नी यांचा समावेश आहे." दोन्ही उमेदवार पक्षातील प्रभावशाली घराण्यांशी संबंधित असल्याने या पदासाठीची चुरस चांगलीच रंगण्याची चिन्हे आहेत.
सर्व उमेदवारांच्या मुलाखती अंबड भाजप कार्यालयात आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत पार पडल्या. मुलाखतीदरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्येक उमेदवाराचा राजकीय प्रभाव, कार्यकर्तृत्व आणि स्थानिक पातळीवरील स्वीकार्यता तपासली. सर्व अर्जांची छाननी करून ती पक्षाकडे पाठविण्यात आली असून, ११ नोव्हेंबरपर्यंत अधिकृत उमेदवारी यादी जाहीर होणार असल्याची माहिती कराड यांनी दिली.
दरम्यान, भाजपने या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने अंबड तालुक्यातील राजकीय समीकरणे पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत भाजप काही ठिकाणी मित्रपक्षांसह लढत होती; परंतु या वेळेस पक्षाने "एकला चलो रे"चा नारा दिल्याने स्थानिक नेत्यांमध्ये आत्मविश्वासाची लाट दिसून येत आहे.
भाजप कार्यकर्त्यांमध्येही या निर्णयाचे स्वागत होत असून, "स्वबळावरची लढत म्हणजे कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याची संधी" अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. पक्षातील उमेदवारांची संख्या पाहता अंतर्गत चुरस मात्र तीव्र आहे, आणि ११ नोव्हेंबरला जाहीर होणाऱ्या अंतिम यादीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
अंबड शहरातील राजकीय रंगमंचावर भाजपचा हा उमेदवारीचा स्फोट म्हणजेच आगामी निवडणुकीत "कोणाचा तुरा उंच राहील?" याचा पहिला ट्रेलर ठरतोय.

Post a Comment
0 Comments