१ कोटींच्या साहित्य गैरव्यवहाराचा पर्दाफाश ? बनावट दस्तऐवजांच्या आरोपांनी मंठ्यात खळबळ
कामगारांना साहित्य वाटपाचा दावा; प्रत्यक्षात वाटप न करताच शासनाची फसवणूक केल्याचा आरोप, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; निष्पक्ष व सखोल चौकशीची
मागणी
मंठा | प्रतिनिधी
मंठा-वाटूर रोडवरील एका गोडाऊनमध्ये तब्बल १ कोटी ८ लाख १९ हजार ६५० रुपयांच्या साहित्याच्या कथित गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे दुकाने निरीक्षक अमित जगन्नाथ भिंगारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात साहित्याचा साठा करून कामगारांना साहित्य वाटप केल्याचे बनावट दस्तऐवज तयार केले, मात्र प्रत्यक्षात साहित्याचे वितरणच झाले नसल्याचा आरोप आहे. या माध्यमातून शासनाची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी अनिल नरहरी मुळे (रा. कंढारी, ता. परतूर) व त्यांचा सहकारी नळगे (रा. वैद्यवडगाव, ता. मंठा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरिक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इंदल राठोड करीत आहेत.
या प्रकरणातील संपूर्ण साखळी, संबंधित कागदपत्रे, साहित्य वितरणाची प्रक्रिया, तसेच यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments