सुखापुरी प्रतिनिधी:-घनसागी तालुक्यातील मौजे मानेपुरी येथील कु. शितल गुंडिभाऊ बकाल यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत सहाय्यक अभियंता (Assistant Engineer – Class-2) पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे मानेपुरी गावासह संपूर्ण घनसावंगी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शितल बकाल यांचे प्राथमिक व उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन, छत्रपती संभाजीनगर येथून अभियांत्रिकी शिक्षण घेतले. शिक्षणादरम्यान अनेक प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जात त्यांनी खचून न जाता सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अखेर त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि MIDC मध्ये सहाय्यक अभियंता (वर्ग-२) पदासाठी त्यांची निवड झाली.
निवडीनंतर त्यांनी जालना MIDC येथे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही योग्य नियोजन, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश मिळवू शकते, हे शितल बकाल यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे.
आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, मोठे भाऊ विठ्ठल बकाल, शिक्षक, मार्गदर्शक आणि हितचिंतक यांना दिले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी प्रत्येक टप्प्यावर दिलेल्या पाठिंब्यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शितल बकाल यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मानेपुरी गाव, घनसावंगी तालुका तसेच जालना जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरत असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना नवी दिशा देणारे आहे. त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments